ब्रह्मपुरी मध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट, पोलीस व तहसील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती गंभीर

AMC24 News
ब्रह्मपुरी
शहर व तालुक्यात अवैध पद्धतीने गांजा, सुगंधी तंबाखू, अवैध दारू विक्री तसेच रेती चोरी व रेती तस्करी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. शहरासह ग्रामीण भागात हे अवैध धंदे खुलेआम सुरू असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या रेती उपसा करून तिची वाहतूक होत असल्याने पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रात्रीच्या सुमारास रेती चोरीचे प्रकार वाढले असून, संबंधित यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
याचबरोबर शहरातील विविध भागांतून अवैध दारू विक्री सुरू असून, गांजा व सुगंधी तंबाखूची सर्रास विक्री होत आहे. या अवैध पदार्थांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून सामाजिक वातावरण पूर्णतः बिघडत चालले आहे.
या सर्व गंभीर प्रकारांकडे स्थानिक पोलीस प्रशासन तसेच तहसीलदार कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन गप्प बसल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे मनोबल वाढले आहे.
नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस व महसूल प्रशासनाने तात्काळ संयुक्त कारवाई करून रेती चोरी, अवैध दारू विक्री तसेच अमली पदार्थांच्या तस्करीवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
AMC24 News 📰 🗞️
मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घुस
9405714165



