महापौर निवड: ‘पुरावा द्या, अन्यथा आम्ही राजीनामा देऊ’; संदीप देशपांडेंच्या आरोपांना संदीप गिऱ्हे यांचे जोरदार प्रत्युत्तर

AMC24 News 📰 🗞️
चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेच्या २०२६ च्या महापौर निवडणुकीत राजकीय घडामोडींना मोठे वळण मिळाले असून, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता उद्धव ठाकरे गटाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी या आरोपांचे सडेतोड खंडन करत देशपांडे यांना जाहीर आव्हान दिले आहे.
संदीप देशपांडे यांनी नुकताच असा दावा केला होता की, चंद्रपूर महापौर निवडणुकीत ठाकरे गटाच्या नगरसेवकांना भाजपला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांचे प्रलोभन देऊन विकत घेण्यात आले आहे. या आरोपांना चोख उत्तर देताना संदीप गिऱ्हे म्हणाले की, “संदीप देशपांडे यांना ही खोटी माहिती नेमकी कोणाकडून मिळाली, त्या व्यक्तीचे नाव त्यांनी त्वरित जाहीर करावे. जर देशपांडे हे आरोप सिद्ध करू शकले, तर मी आणि आमचे सर्व पदाधिकारी तातडीने आपल्या पदांचा राजीनामा देऊ.”

राजकीय युतीबद्दलची पार्श्वभूमी स्पष्ट करताना गिऱ्हे यांनी सांगितले की, काँग्रेससोबतची चर्चा वारंवार निष्फळ ठरल्यामुळे आणि सातत्याने होणाऱ्या अपमानामुळेच त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही चर्चेसाठी अनेकदा काँग्रेसच्या कार्यालयात आणि नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी जाऊन बसलो होतो, मात्र तिथून आम्हाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जर आम्हाला केवळ पैशासाठी किंवा स्वार्थासाठी हा निर्णय घ्यायचा असता, तर आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबत वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला नसता.”

संदीप गिऱ्हे यांनी पुढे नमूद केले की, “संदीप देशपांडे हे स्वतः एकेकाळी शिवसैनिक राहिले आहेत, त्यामुळे त्यांनी शिवसैनिकांच्या निष्ठेवर अशा प्रकारचे चुकीचे आरोप करू नयेत. स्थानिक पातळीवर पक्ष आणि कार्यकर्त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही स्वाभिमानाची लढाई लढलो आहोत. या सर्व घडामोडींची कल्पना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आली होती आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.”

चंद्रपूर महापालिकेत सध्या राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, भाजपच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव करून महापौरपद पटकावले आहे. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ईश्वरचिठ्ठीद्वारे ठाकरे गटाचे प्रशांत दानव यांची निवड झाली असून, आगामी काळात स्थायी समितीचे अध्यक्षपदही याच गटाला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संदीप गिऱ्हे यांनी शेवटी असे स्पष्ट केले की, ते लवकरच मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत.
AMC24 News 📰🗞️
मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुग्घुस
9405714165




