*भविष्यात व्याघ्र जिल्ह्यांतील खेळाडू आंतरराष्ट्रीय हॉकी गाजविणार – आ. विजय वडेट्टीवार*
*ब्रम्हपुरी येथे राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे थाटात उद्घाटन*
AMC24 new घुग्घूस
ग्रामीण खेळाडुंमध्ये जिद्द, चिकाटी यांसह प्रगल्भ ईच्छा शक्ती व प्रतिभा असतांनाही सुविधांच्या अभावांमुळे त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या खेळांचे प्रदर्शन करणे शक्य होत नाही. अशा खेळाडुंच्या स्वप्नांना पंख देण्याहेतू शिक्षणाची पंढरी असलेल्या ब्रम्हपुरी नगरीत ग्रामीण खेळाडूना आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान उपलब्ध करून देण्यासाठी शासना मार्फत कोट्यावधींचा निधी मंजूर करून दिला. याचा पुरेपूर लाभ घेऊन वाघांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर हॉकीसह अन्य स्पर्धांमध्ये इतिहास रचून आपल्या ब्रम्हपुरी क्षेत्राचे नावलौकिक करावे असे प्रतिपादन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी येथे हॉकी असोसिएशन द्वारा आयोजित राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा आमदार चषक च्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
आयोजित उद्घाटन सोहळ्यास अध्यक्ष म्हणून प्रा.सुभाष बजाज तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, तहसीलदार सतीश मासाळ, मुख्याधिकारी अर्शिया जुही, ठाणेदार प्रमोद बानबले, महाराष्ट्र हाॅकी उपाध्यक्ष मनीषा आखरे, माजी नगरसेवक सागर आमले, वनपरिक्षेत्र अधिकारी धोंडणे, तालुका क्रिडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, ईकबाल जेसानी, संजय पारटवार यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ब्रम्हपुरी तालुक्याला स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासूनच हॉकी खेळाचा वारसा लाभला आहे. आज ब्रह्मपुरी येथे आयोजित चार दिवसीय हॉकी स्पर्धेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या चमुंनी या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शविला असून थेट मुंबईतून संघ येथे दाखल झाले आहेत. ही अभिमानाची बाब असून भविष्यात मैदानी खेळांकरिता येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार मैदानी तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असून तत्पूर्वी त्या सरावांकरिता 12 कोटींचा विकास निधी येथील तालुका क्रीडा संकुलाला उपलब्ध करून दिला. भविष्यात ब्रह्मपुरी येथे हॉकी अकादमी सुरू करून येथील खेळाडू देश-विदेश स्तरावरील सामन्यांमध्ये सहभागी होऊन इतिहास रचणार व वाघांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील या ब्रह्मपुरीचे वाघ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दर्जेदार कामगिरी बजावणार असेही ते म्हणाले.
तर अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक बजाज म्हणाले की, क्षेत्राचे लोकप्रतिनिधी नामदार विजय वडेट्टीवार यांचे आणि यशाचे फार जुने नाते असून त्यांनी आजवर केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला भरघोस यश मिळाले आहे. भविष्यातही आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शन नक्की चालविलेल्या प्रयत्नांना देखिल येथील हाकी असोसिएशनला सुगीचे दिवस येतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सोबतच त्यांनी हॉकी खेळाचे प्रेरणास्थान मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकत उपस्थित हाकी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सू्त्रसंचालन सूरज मेश्राम,प्रास्ताविक निनाद गडे यांनी केले.आभार प्रदर्शन मोंटु पिलारे यांनी केले. आयोजित कार्यक्रमास ब्रह्मपुरी हॉकी असोसिएशनचे सर्व सभासद, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
AMC24 new घुग्घूस. मुख्य संपादक अरविंद चाहादे
- 9405714165



