आंदोलने निवेदन देऊन ही राज्य उत्पादन शुल्क विभाग गाढ झोपेत….

घुग्घुस : AMC 24NEWS
मुख्य संपादक. अरविंद चाहादे घुग्घुस
घुग्घुस शहरातील देशी दारू दुकाने रविवारी बंद ठेवण्याच्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीतर्फे दि. ६ ऑगस्ट रोजी गांधी चौक येथे महिलांसह मोठे धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची बातमी सर्व प्रमुख दैनिकांत प्रसिद्ध झाली होती.
परंतु, एवढा मोठा आंदोलनाचा आवाज उठूनही आजतागायत प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत तीव्र संताप असून “प्रशासन गप्प का आहे? दारू माफियांचे पैसे खात आहे काय?” असा प्रश्न सर्रास विचारला जात आहे.
दर रविवारी घुग्घुस शहरात मोठा आठवडी बाजार भरतो. महिलांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र, दारूच्या दुकानासमोर दारुड्यांची गर्दी होत असल्याने महिलांना त्रास सहन करावा लागतो आणि शहराच्या शांततेला बाधा निर्माण होते.
बहुजन समाज पार्टीचे घुग्घुस शहराध्यक्ष सिद्धार्थ कोंडागुरला यांनी स्पष्ट केले आहे की —
घुग्घुस शहरातील दोन्ही देशी दारू दुकाने रविवारी बंद करण्याचे आदेश तातडीने देण्यात यावेत.
जर आवश्यक ती कारवाई झाली नाही तर राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर यांच्या विरोधातही आंदोलन उभारले जाईल.
प्रशासनाने नागरिकांचा आवाज ऐकून तातडीने दारूबंदीची कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा संताप अधिक वाढेल आणि मोठ्या आंदोलनाची ठिणगी पडेल, असा इशारा बीएसपीने दिला आहे.




