*CTPS कोट्यवधी कॉपर चोरी प्रकरण – “फक्त चोर नाही, तर संपूर्ण सुरक्षा साखळीच संशयाच्या भोवऱ्यात”!*
*शिवसेनेची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशीची मागणी*

AMC24 News 📰 🗞️
*चंद्रपूर, दि. 07/10/2026*
चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (CTPS) मधील कोट्यवधी रुपयांच्या कॉपर केबल चोरी प्रकरणाने महाजेनकोच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. CISF, MSF आणि शेकडो सुरक्षा कर्मचारी असताना ट्रक भरून कॉपर बाहेर जातो कसा? हा प्रश्न आता प्रत्येक चंद्रपूरकर विचारत आहे.
चंद्रपूरातील दैनिक वृत्तपत्रात दि. 21, 27, 30 सप्टेंबर व 2 ऑक्टोबर 2026 रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये आरोपींना अटक, ट्रक जप्त आणि नेटवर्कचा उल्लेख आला आहे. पण मूळ प्रश्न अनुत्तरित आहे – *सुरक्षा असूनही चोरी झालीच कशी?

या प्रकरणात मी शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष, शिवसेना भारतीय कामगार संघटना, चंद्रपूर या नात्याने महाजेनकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, मुंबई यांच्याकडे 12 मुद्द्यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
*शिवसेनेच्या 12 मागण्या -*
*1. CTPS अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका तपासा:* या चोरीत कोणत्याही अधिकाऱ्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग, निष्काळजीपणा किंवा कर्तव्यात कसूर आहे का? याची स्वतंत्र चौकशी करा.
*2. CISF व MSF सुरक्षा व्यवस्थेची सखोल चौकशी करा:* चोरीच्या काळातील गेटवरील सुरक्षा व्यवस्था, वाहन तपासणी, प्रवेश-निर्गमन रजिस्टर, गेट पास, CCTV फुटेज, ड्युटी चार्ट आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचे अहवाल ताब्यात घेऊन तपासा.
*3. CISF तैनातीचे कारण स्पष्ट करा:* चंद्रपूर आता नक्षलमुक्त झाला आहे, शासनाने यादीतून काढले आहे. मग CTPS मध्ये CISF कोणत्या निकषावर आणि कोणत्या आदेशाने ठेवली आहे? नक्षलचे विशेष भत्ते अजूनही सुरू आहेत का? हे जाहीर करा.

*4. सुरक्षा असूनही चोरी कशी झाली? याचे Security Audit करा:* CISF, MSF असताना ट्रकने माल बाहेर गेला, ही सुरक्षा यंत्रणेची 100% नाकामी आहे. संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचे स्वतंत्र ऑडिट करा.
*5. संगनमताची शक्यता तपासा:* अधिकारी, सुरक्षा कर्मचारी, कंत्राटदार, वाहन मालक-चालक आणि बाहेरील लोक यांच्यात संगनमत आहे का? कोणालाही आधीच दोषी न धरता पुराव्याच्या आधारे चौकशी करा.
*6. मागील 5 वर्षांच्या चोरींची चौकशी करा:* ही पहिलीच चोरी नाही. मागील 5 वर्षात कॉपर, पाईप, स्क्रॅप किती चोरीला गेले? स्टॉक रजिस्टर, मटेरियल रजिस्टर, स्क्रॅप रेकॉर्ड, गेट पास आणि जुन्या तक्रारी तपासा.

*7. चोरीचे प्रमाण आणि आर्थिक नुकसान निश्चित करा:* CTPS मधील कॉपर केबलच्या एकूण स्टॉकची तांत्रिक तपासणी करून नेमके किती कोटींचे नुकसान झाले, याचा अहवाल तयार करा.
*8. संबंधित ट्रकची संपूर्ण कुंडली काढा:* तो ट्रक कोणाचा? चालक कोण? CTPS मध्ये कधी, कोणत्या गेटने, कोणाच्या परवानगीने आला? तपासणी कोणी केली? बाहेर कोणत्या गेटने गेला? सर्व CCTV आणि रजिस्टर तपासा.
*9. सुरक्षा खर्चाचा आढावा घ्या:* महाजेनको सुरक्षा व्यवस्थेवर दरवर्षी कोट्यवधी खर्च करते. त्या खर्चाच्या तुलनेत सुरक्षा किती प्रभावी आहे? याचा स्वतंत्र आर्थिक आणि सुरक्षा ऑडिट करा.
*10. स्थानिक बेरोजगारांना संधी द्या:* CISF ची आवश्यकता तपासून ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवक आणि होमगार्ड यांना प्रशिक्षण देऊन रोजगार द्या. यामुळे महाजेनकोचे पैसे वाचतील आणि स्थानिकांना रोजगार मिळेल.
*11. दोषींवर कठोर कारवाई करा:* चौकशीत अधिकारी, सुरक्षा कर्मचारी, कंत्राटदार कोणीही दोषी आढळल्यास त्याच्यावर सेवाशिस्त आणि कायद्यानुसार कठोर कारवाई करा.
*12. चौकशी अहवाल जाहीर करा:* चोरीचे प्रमाण, नुकसान, सुरक्षा त्रुटी, जबाबदार व्यक्ती आणि भविष्यातील उपाययोजना यांचा संपूर्ण अहवाल जनतेसमोर जाहीर करा.

*मुख्य इशारा -*
केवळ 2-4 आरोपींना अटक करून प्रकरण दाबू नका. चोरीला संधी देणारी संपूर्ण प्रशासकीय आणि सुरक्षा साखळी तपासा. 7 दिवसांत उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी समिती नेमली नाही तर शिवसेना भारतीय कामगार संघटना CTPS मुख्य गेटवर तीव्र आंदोलन करेल.

AMC24 News 📰
मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुग्घुस
9405714165



