Wednesday, August 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedजपतलाई आश्रमशाळेतील सापदंशाची काळीज पिळवटून टाकणारी घटना: ३ विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू, १...

जपतलाई आश्रमशाळेतील सापदंशाची काळीज पिळवटून टाकणारी घटना: ३ विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू, १ जण व्हेंटिलेटरवर; माजी खासदार डॉ. अशोक नेते यांची रुग्णालयात धाव यासोबतच घटनास्थळी जाऊन पाहणी..*

*जपतलाई आश्रमशाळेतील सापदंशाची काळीज पिळवटून टाकणारी घटना: ३ विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू, १ जण व्हेंटिलेटरवर; माजी खासदार डॉ. अशोक नेते यांची रुग्णालयात धाव यासोबतच घटनास्थळी जाऊन पाहणी..*

​        AMC24 News 📰 🗞️ 

विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा

धानोरा / गडचिरोली (दि. १० ऑगस्ट २०२६):
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या जपतलाई येथील अनुदानित शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात एक अत्यंत दुर्दैवी व काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली आहे. वसतिगृहात पुरेशा खाटांअभावी जमिनीवर झोपलेल्या विद्यार्थिनींना मध्यरात्रीच्या सुमारास अत्यंत विषारी मण्यार (दांडेकरेटा) सापाने दंश केल्याने तीन निष्पाप चिमुकल्या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर इतर विद्यार्थिनींवर सध्या गंभीर स्थितीत वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
*​मध्यरात्री १:३० च्या सुमारास घडला प्रकार*


​मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्टच्या रात्री जेवण आटोपून विद्यार्थिनी वसतिगृहातील जमिनीवर झोपल्या होत्या. मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास ‘दांडेकरेटा’ (मण्यार) या विषारी सापाने झोपेत असलेल्या मुलींना दंश केला. मुलींनी आरडाओरड केल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास बाधित विद्यार्थिनींना तातडीने धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
​मात्र, विष शरीरात भिनल्यामुळे उपचारादरम्यान:
​दीपिका एकनाथ लाकडा (वय १२ वर्षे, रा. जवेली, ता. एटापल्ली – वर्ग ६ वा)
​सुश्मिता सरोजित मंडल (वय १४ वर्षे, रा. मॅडरी, ता. एटापल्ली – वर्ग ८ वा)
या दोन मुलींची प्राणज्योत मालवली.
​त्यानंतर उर्वरित मुलींची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले जात असताना वाटेतच अंबू गजुराम कोरेटी (वय ७ वर्षे, रा. केहकावाई, ता. धानोरा – वर्ग २ रा) या चिमुकलीचा मृत्यू झाला.


​याशिवाय, घटनेनंतर इतर १४ विद्यार्थिनींना उलटी व मळमळ असा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. उपचाराधीन मुलींपैकी समृद्धी सुरेश नैताम (वय १४ वर्षे) हिची प्रकृती अत्यंत गंभीर असून ती व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत आहे.

*​माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची तातडीने धाव व सांत्वन*

​या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी तातडीने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचून बाधित मुलींची व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. रुग्णालयातील डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करून मुलींवर अत्याधुनिक व योग्य उपचार पुरवण्याचे कडक निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

​यानंतर मा.खा.डॉ. नेते यांनी धानोरा येथील ग्रामीण रुग्णालय, शवविच्छेदन केंद्र तसेच दुर्घटना घडलेल्या जपतलाई आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. मृत विद्यार्थिनींच्या शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व धीर दिला.

*राज्याचे ​मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीही या घडलेल्या घटनेची दखल घेत दुःख व्यक्त केले असे प्रसारमाध्यमांशी बोलतांना माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी दिली माहिती*
​प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. अशोकजी नेते म्हणाले:


​”ही घटना अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. घडलेल्या दुःखात आम्ही पीडित कुटुंबीयांसोबत आहोत. या घटनेची माहिती तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना देण्यात आली असून त्यांनीही तीव्र दुख व्यक्त केले आहे. शासनाच्या वतीने पीडित आणि मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त आर्थिक मदत व सहकार्य मिळवून देण्यासाठी मी वैयक्तिक पातळीवर विशेष प्रयत्न करेन.”

 

*​आश्रमशाळेतील अपुऱ्या व्यवस्थेवर तीव्र नाराजी”*

 

​आश्रमशाळेत खाटांची सोय नसल्याने विद्यार्थिनींना जमिनीवर झोपण्याची वेळ आली, ही बाब अत्यंत गंभीर असून डॉ. अशोकजी नेते यांनी आश्रमशाळा व्यवस्थापन व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर तीव्र ताशेरे ओढले. “विद्यार्थ्यांच्या जिवाशी व सुरक्षेशी खेळणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे. भविष्यात कोणत्याही आश्रमशाळेत अशी पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

*​लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची उपस्थिती*
​या पाहणी दौऱ्यादरम्यान गडचिरोलीचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, आयुक्त आयुषी सिंग, उपायुक्त राचलवार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे,जिल्हा उप शल्यचिकित्सक उईके मॅडम, माजी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, न.प. सभापती सीमा कन्नमवार, तालुका अध्यक्ष साजन गुंडावार, तालुका अध्यक्ष दत्तु सुत्रपवार, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष मधुकर भांडेकर, जिल्हा सचिव सारंग साळवे, शिल्पा गव्हारे, गजानन साळवे, कीर्ती मासुरकर, विजयजी कुमरे, सुभाष खोबरे यांच्यासह शासकीय अधिकारी, भाजप पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक

अरविंद चाहादे घुग्घुस

9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular