Wednesday, August 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedजागेअभावी एकही पात्र व्यक्ती घरकुलापासून वंचित राहू नये      ...

जागेअभावी एकही पात्र व्यक्ती घरकुलापासून वंचित राहू नये                                                                  – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे जिल्हा परिषदद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा. बैठकीस पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांची उपस्थिती


जागेअभावी एकही पात्र व्यक्ती घरकुलापासून वंचित राहू नये

                                                                 – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

जिल्हा परिषदद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा

 

बैठकीस पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांची उपस्थिती

विशेष प्रतिनिधी वर्धा.  AMC24 News 

वर्धा, दि.11 (जिमाका) : प्रत्येक बेघर आणि पात्र व्यक्तीस हक्काचे घर उपलब्ध व्हावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. घरकुलासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याची तरतूद देखील शासनाने केली आहे. जागा उपलब्ध होत नसल्यास जागा खरेदीसाठी अनुदान दिले जाते. त्यामुळे केवळ जागा उपलब्ध नाही या कारणास्तव एकही पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये, असे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात श्री.गोरे यांनी जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, आ.समीर कुणावार, आ.सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांच्यासह विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

वर्षभरात 5 लाख 50 हजार घरकुले बांधून देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. प्रत्येक महिण्याला आपण 1 लाख 25 हजार लाभार्थ्यांना घरे बांधून देतो. वर्धा जिल्ह्याला टप्पा दोन मध्ये 21 हजार घरकुलांचे उद्दिष्ट आहे. ते लवकरात लवकर पुर्ण करा. घरकुलासाठी लाभार्थ्यांना मोफत वाळु देण्याचे शासनाचे धोरण आहे. जिल्ह्यात मोफत वाळू उपलब्ध होईल, याकडे प्राधान्याने लक्ष द्या, असे ग्रामविकास मंत्री म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना लखपती दीदी करण्याचा संकल्प केला आहे. राज्यात यावर्षी 1 कोटी दीदींना लखपती करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी गटाबाहेर असलेल्या महिलांना स्वयंसहायता गटाशी जोडणे आवश्यक आहे. त्याकरीता जिल्ह्यात शासनाने निश्चित केल्याप्रमाणे 2 हजार 752 स्वयंसहायता गट नव्याने तयार करण्यात यावे. जास्तीत जास्त महिलांना गटाशी जोडून त्यांचे आर्थिक जीवनमान कसे उंचावेल, यासाठी जिल्ह्याने प्रयत्न करावे, असे श्री.गोरे म्हणाले.

यावेळी त्यांनी स्मार्ट योजनेंतर्गत सोलर बसविणे, पीए जनमन, उमेद अभियान, उजास प्रकल्प, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा आढावा घेतला. पंचायतराज अभियान यावर्षी चांगल्या प्रकारे राबविले. गावाचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची क्षमता असलेले हे अभियान यावर्षी अधिक जोमाने राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

 

वर्धा जिपचा उपक्रम राज्यभर राबणार

जिल्हा परिषदेच्यावतीने घरकुल लाभार्थ्यांचा आपसातील (कौटुंबिक) जागेचा वाद मिटविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या वादनिवारण उपक्रमाचे ग्रामविकास मंत्र्यांनी कौतूक केले. त्यांनी बैठकीतूनच ग्रामविकास सचिवांशी संपर्क साधून सदर उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यासाठी सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे निर्देश दिले.

 

 

पालकमंत्री डॅा.पंकज भोयर यांनी देखील यावेळी जिल्हा प्रशासनास उपयुक्त सूचना केल्या. आ.वानखेडे यांनी जिल्ह्याचे घरकुलाचे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे, घरकुलाच्या याद्या करतांना वृद्ध, दिव्यांग, विधवा यांना प्राधान्य द्यावे, घरकुल कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन नियमित देण्यात यावे, अशी मागणी केली. त्यावरून आठ दिवसात मानधन जमा करण्यात येतील, असे श्री.गोरे यांनी सांगितले. आ.समीर कुणावार यांनी जलजीवन मिशनची कामे तातडीने पुर्ण होण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. सुरुवातीस मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी सादरीकरण केले. यावेळी त्यांनी विविध योजनेंतर्गत कामांची प्रगती सादर केली.

AMC 24 News 📰 🗞️

मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घुस

9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular