चंद्रपूर मनपात सत्तेचा नवा ‘चंद्रोदय’! भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला दीड वर्षाच्या महापौरपदाची ऑफर

AMC24 News 📰 🗞️
चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेचा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) चक्क शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सत्तास्थापनेसाठी साद घातली असून, दीड वर्षांच्या महापौरपदाचा नवा ‘फॉर्म्युला’ समोर ठेवल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.
काय आहे नवा पॉवर फॉर्म्युला?
चंद्रपूरमध्ये ६६ जागांपैकी काँग्रेसकडे २७, तर भाजपकडे २३ जागा आहेत. बहुमतासाठी ३४ आकड्यांची गरज असताना ६ नगरसेवक असलेली ठाकरेंची शिवसेना ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने ठाकरे गटाला खालील प्रस्ताव दिला आहे:
दीड-दीड वर्षांचा कार्यकाळ: ५ वर्षांच्या कार्यकाळात पहिले दीड वर्ष ठाकरे गटाचा महापौर असेल, तर उर्वरित अडीच वर्ष भाजपचा महापौर राहील.
स्थायी समिती: महत्त्वाच्या स्थायी समितीचे सभापतीपदही वाटून घेण्याबाबत चर्चा सुरू आहे.
उद्देश: काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने हे ‘पाऊल’ उचलल्याचे बोलले जात आहे.
‘मातोश्री’वर हालचालींना वेग; उद्धव ठाकरेंचा फ्री-हॅन्ड
या प्रस्तावानंतर चंद्रपूरमधील ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी मुंबईत धाव घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कोणत्याही परिस्थितीत पक्षाचा सन्मान राखला जाईल, तिथेच सत्ता स्थापन करा, असा ‘फ्री-हॅन्ड’ निरोप उद्धव ठाकरेंनी स्थानिक नेत्यांना दिला आहे. मात्र, राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीत असलेल्या ठाकरे गटाने भाजपचा हा प्रस्ताव स्वीकारल्यास राजकीय वर्तुळात मोठे भूकंप होण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसची धाकधूक वाढली
दुसरीकडे, सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचा फायदा भाजप उचलण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेसनेही ठाकरे गटाला अडीच वर्षांच्या महापौरपदाचे गाजर दाखवले असले, तरी भाजपने दिलेल्या प्रस्तावामुळे काँग्रेसच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
आता ठाकरेंची शिवसेना कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालते, की चंद्रपुरात पुन्हा एकदा भाजप-सेनेचे जुने दिवस पाहायला मिळतात, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.
AMC 24 News 📰🗞️
मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुग्घुस
9405714165



