Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedघुग्गुसचे ग्रामीण रुग्णालय नागरिकांच्या आरोग्यसेवेचे केंद्र व्हावे – पालकमंत्री डॉ. अशोक उईके...

घुग्गुसचे ग्रामीण रुग्णालय नागरिकांच्या आरोग्यसेवेचे केंद्र व्हावे – पालकमंत्री डॉ. अशोक उईके  30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण

घुग्गुसचे ग्रामीण रुग्णालय नागरिकांच्या आरोग्यसेवेचे केंद्र व्हावे – पालकमंत्री डॉ. अशोक उईके
 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण

AMC24 News 📰

चंद्रपूर, दि. 20 : घुग्गुस परिसर हा औद्योगिक व खाण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या परिसरातील सर्वसामान्य नागरिक आणि विशेषतः गरजू रुग्णांना वेळेत, सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे आवश्यक आहे. नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयातून गरीबातील गरीब रुग्णालाही उत्तम उपचार मिळावेत. प्रत्येक रुग्णाशी सन्मानाने व संवेदनशीलतेने वागून हे रुग्णालय परिसरातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने ‘आरोग्यसेवेचे केंद्र’ व्हावे,  

असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.
घुग्गुस येथील ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, घुग्गुसच्या नगराध्यक्ष दीप्ती सोनटक्के, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक काटरे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

 


पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून घुग्गुस येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे. आजपासून हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहे. दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नागरिकांना विविध शासकीय सेवा अधिक

 

प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने घुग्गुस ग्रामीण रुग्णालयातून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या मानस आहे.
घुग्गुस व लगतचा परिसर खाण आणि औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे येथे कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रुग्णालयातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने सेवाभाव ठेवून काम करावे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही रुग्ण आरोग्यसेवेपासून वंचित राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि उपचारासाठी अनावश्यक त्रास सहन करावा लागू नये. परिसरातील सिकलसेल ॲनिमियाच्या रुग्णांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

अशा रुग्णांची एकत्रित माहिती तयार करावी. रुग्णांच्या आरोग्यविषयक अडचणी जाणून घेऊन त्यांना आवश्यक उपचार, तपासण्या आणि शासकीय योजनांचा लाभ वेळेत उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
लोकार्पणानंतर पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. उपलब्ध वैद्यकीय सुविधा, उपचार व्यवस्था आणि रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.

 


आयुष्मान कार्डसाठी सर्वेक्षण करा : घुग्गुस परिसरातील किती नागरिकांकडे आयुष्मान भारत योजनेचे कार्ड उपलब्ध आहे, याबाबत सर्वेक्षण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. पात्र असूनही ज्या नागरिकांकडे आयुष्मान कार्ड नाही, अशा नागरिकांना कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने पुढाकार घ्यावा. केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
रुग्णालयात दर्शनी भागात माहिती फलक व नकाशा लावा : सामान्य नागरिकाला रुग्णालयात आल्यानंतर कोणत्या उपचारासाठी कुठे जावे, कोणता विभाग कुठे आहे आणि संबंधित डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचारी कधी उपलब्ध असतील, याची माहिती सहज मिळाली पाहिजे. त्यासाठी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ विविध विभागांचा स्पष्ट दिशादर्शक नकाशा, उपलब्ध डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक तसेच केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची माहिती देणारे दर्शनी फलक लावावेत.


30 खाटांचे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय : घुग्गुस येथे उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय 30 खाटांचे असून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. रुग्णालयात नोंदणी कक्ष, महिला व पुरुष वॉर्ड, प्रसूतीगृह, बाह्यरुग्ण विभाग, प्रसूतीपश्चात कक्ष, शस्त्रक्रियागृह, नेत्र तपासणी विभाग, प्रयोगशाळा आणि औषध भांडार आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

AMC24 News 📰

मुख्य संपादक

अरविंद चाहादे घुग्घुस 9405714165

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular