चंद्रपूर जिल्ह्यात बांधकाम कामगारांना किट वितरणात अडथळे; अपॉइंटमेंट असूनही रिकाम्या हाताने परत
मोफत योजनांसाठी कामगारांचा हजारो रुपयांचा खर्च; कामगार मंत्र्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी

AMC24 News 📰 🗞️
- विषेश प्रति नीधी. ब्रह्मपुरी। तालुका
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना गृहसंच, अत्यावश्यक किट तसेच इतर विविध संच वितरित करण्याची योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी अत्यंत संथ व विस्कळीत पद्धतीने होत असल्याची तक्रार कामगारांकडून होत आहे.
माहितीनुसार, संबंधित कामगारांना किट मिळविण्यासाठी आधी ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. त्यानंतर जिल्हा कामगार कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे ठराविक तारखेला हजर राहण्याचे निर्देश दिले जातात. परंतु प्रत्यक्षात त्या दिवशी उपस्थित राहूनही कामगारांना गृहसंच किंवा अत्यावश्यक किट दिले जात नाही. “साठा उपलब्ध नाही” किंवा इतर कारणे देत कामगारांना परत पाठविले जात असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्याच्या दुर्गम भागांतून अनेक कामगार मुख्यालयात येण्यासाठी 800 ते 1000 रुपये खर्च करून येत असतात. शासनाच्या या योजना मोफत असल्या तरी प्रत्यक्षात कामगारांना प्रवास व इतर खर्चामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यामुळे संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नियोजनाच्या अभावामुळे कामगारांना त्रास सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट होत आहे. कामगारांनी घेतलेल्या अपॉइंटमेंटनुसारच त्यांना साहित्य उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना तसे होत नसल्याने प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, कामगारांनी कामगार मंत्र्यांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष घालून आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात, तसेच कामगारांना दिलेल्या तारखेलाच गृहसंच, अत्यावश्यक किट व इतर साहित्य वितरित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
AMC24 News 📰 🗞️
मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुग्घूस
9405714165



