*विरूर स्टेशन रस्त्याची पाहणी; नवीन रस्त्यासाठी प्रस्ताव लवकरच शासनाकडे
*PWD डेप्युटी इंजिनियर अभिजीत पुलावार यांचे आश्वासन; स्थानिक नेत्यांची उपस्थिती*
AMC24 News. अरविंद चाहादे
9405714165.
राजुरा |. विशेष प्रतिनिधी.
विरूर स्टेशन परिसरातील मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकांच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर मा. अभिजीत पुल्लावार यांनी आज शुक्रवार, २५ जुलै २०२५ रोजी स्वतः घटनास्थळी भेट देत रस्त्याची पाहणी केली. स्थानिक नागरिक आणि पदाधिकाऱ्यांनी या वेळी त्यांच्याशी थेट संवाद साधून नव्याने रस्ता तयार करण्याची जोरदार मागणी मांडली.
या दरम्यान रस्त्याच्या सध्याच्या स्थितीबाबत नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त करत गंभीर समस्या उघड केल्या. वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे खड्डे, अपूर्ण पायाभूत सुविधा आणि नियमित पाणी साचण्यामुळे होणाऱ्या अपघातांचे वास्तव पुलावार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सदर रस्त्याचे नुतनीकरण हॅम (HAM) योजनेअंतर्गत करण्यासाठी लवकरच प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या भेटीवेळी भारतीय जनता पक्षाचे शहरप्रमुख भीमराव पाला, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रविण चिडे, स्थानिक प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी फिरोज सय्यद यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते. राजकीय भिन्नतेकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या समस्यांसाठी एकत्र येणारी ही उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
रस्ता नव्याने तयार झाला तर परिसरातील वाहतूक सुरळीत होऊन स्थानिक विकासाला चालना मिळेल, अशी भावना नागरिकांमध्ये दिसून आली. गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनते.
प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची तात्काळ अंमलबजावणी झाली नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा काही नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे या पाहणी दौऱ्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत स्थानिक जनतेचे लक्ष पूर्णपणे या प्रक्रियेवर केंद्रित आहे.




