Tuesday, October 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedतृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक – डॉ. व्यवहारे ...

तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक – डॉ. व्यवहारे सामाजिक न्याय व सप्तरंगी सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा

तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक – डॉ. व्यवहारे

सामाजिक न्याय व सप्तरंगी सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा

AMC24 News 📰

चंद्रपूर, दि. 26 : तृतीयपंथीय हा समाजाचा एक घटक आहे. त्यांच्याकडे केवळ सहानुभूतीच्या नजरेने न पाहता समाजातील समान अधिकार असलेला एक वर्ग म्हणून स्वीकारले पाहिजे. तृतीयपंथीय समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनासोबत समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपाद अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले.

नियोजन भवन येथे सामाजिक न्याय विभाग, चंद्रपूर आणि सप्तरंगी सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 26) विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. व्यवहारे बोलत होते. मंचावर अतिरिक्त्‍ पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, सहायक आयुक्त (समाजकल्याण) विनोद मोहतुरे, सप्तरंगी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा तथा तृतीयपंथीय कल्याण महामंडळाच्या सहअध्यक्षा डॉ. सान्वी जेढवाणी, तृतीयपंथीय प्रतिनिधी राज आणि साजन उपस्थित होते.

तृतीयपंथीयांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणारी ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे सांगून डॉ. व्यवहारे म्हणाले, शासनाने तृतीयपंथीय व्यक्तींच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी कायदेशीर तरतुदी केल्या असून, त्यांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड, शिधापत्रिका आणि मतदार नोंदणीसारख्या आवश्यक बाबी पूर्ण करण्यास प्रोत्साहन द्यावे. शासनाने तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती केली आहे. या माध्यमातून उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्यासाठी संबंधितांनी पुढे यावे. समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनीही तृतीयपंथीयांविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करावी.

 

यावेळी मुख्य मार्गदर्शक डॉ. सान्वी जेढवाणी म्हणाल्या, तृतीयपंथीय हा समाजाचाच एक अविभाज्य घटक असून, त्यांना सन्मानाने जगण्याचा, शिक्षण घेण्याचा, रोजगार करण्याचा आणि समाजात समान संधी मिळविण्याचा अधिकार आहे. मात्र, आजही समाजात तृतीयपंथीयांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. त्यांच्याबाबत असलेले गैरसमज, पूर्वग्रह आणि भेदभाव दूर करून समाजाने त्यांना माणूस म्हणून स्वीकारणे ही काळाची गरज आहे. आजही अनेक तृतीयपंथीय व्यक्ती रेल्वेस्थानके, टोलनाके किंवा सार्वजनिक ठिकाणी उदरनिर्वाह करताना दिसतात. तृतीयपंथीय समुदायाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याऐवजी त्यांना शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

 

तृतीयपंथीय समुदायाचे अस्तित्व प्राचीन काळापासून आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक ‘नालसा’ (NALSA) निर्णयानंतर तृतीयपंथीयांच्या स्वतंत्र ओळखीला कायदेशीर मान्यता मिळाली आणि त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणाला बळ मिळाले. तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी पुढाकार घ्यावा. बीज भांडवल योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना व्यवसायासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जसुविधा उपलब्ध होऊ शकते.

 

पुढे त्या म्हणाल्या, राज्य शासनाने तृतीयपंथीयांचे उच्च शिक्षण मोफत केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात संरक्षण कक्ष कार्यान्वित करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. शासकीय येाजनांचा लाभ घेण्यासाठी तृतीयपंथीयांनी आधार कार्ड, शिधापत्रिका, आयुष्मान भारत कार्ड तसेच इतर आवश्यक कागदपत्रे तयार करून घ्यावीत.

 

तृतीयपंथीयांच्या संरक्षणासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध – ईश्वर कातकडे

 

अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे म्हणाले, तृतीयपंथीय समुदायाकडे पाहण्याचा समाजाचा पारंपरिक दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे. या घटकाला अनेक वर्षे उपेक्षा आणि भेदभाव सहन करावा लागला. मात्र, आता परिस्थितीत सकारात्मक बदल होत असून, पोलीस भरतीसारख्या क्षेत्रांतही तृतीयपंथीयांना संधी उपलब्ध होत आहे. कोणत्याही प्रकारचा अन्याय, छळ किंवा अडचण निर्माण झाल्यास तृतीयपंथीय व्यक्तींनी आपत्कालीन मदतीसाठी 112 या क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी, संचालन सचिन फुलझेले यांनी केले. तत्पुर्वी तृतीयपंथीयांसाठी असलेल्या विविध योजनाच्या पुस्तिकेचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

AMC24 News

मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घुस

9405714165

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular