विरूर स्टेशन परिसरातील मनोरंजन क्लबच्या परवानगीवर पैशांच्या महापूर?

चंद्रपूर |. 25. 6 2026 विरूर स्टेशन येथील एका प्रस्तावित मनोरंजन क्लबच्या परवानगी प्रक्रियेसंदर्भात मोठ्या आर्थिक व्यवहाराच्या चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित क्लबसाठी सुमारे ३० लाख रुपयांत बोलणी झाल्याचा दावा केला जात आहे. तसेच, तेलंगणातील एका क्लब चालकाने जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत एका महिला कर्मचाऱ्यांच्या सहायकाला २० लाख रुपये दिल्याचाही आरोप केला जात आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित मनोरंजन क्लब २८ जूनपासून सुरू होणार असल्याची चर्चा असून, त्यासाठी इमारतीची साफसफाई व इतर तयारीचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे स्थानिक स्तरावर विविध प्रश्न उपस्थित होत असून, परवानगी प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली का, याबाबतही नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे

दरम्यान, या कथित आर्थिक व्यवहाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि आरोपांमध्ये तथ्य असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. विशेषतः, या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) स्वतंत्र चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक स्तरावरून पुढे येत आहे.

मात्र, या वृत्तात नमूद करण्यात आलेले सर्व आरोप हे सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार असून त्यांची कोणत्याही सक्षम शासकीय यंत्रणेने अधिकृत पुष्टी केलेली नाही. संबंधित अधिकारी किंवा संबंधित पक्षाची अधिकृत भूमिका अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यांची प्रतिक्रिया प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
AMC 24 News 📰 🗞️




