*चंद्रपूर जिल्ह्यात मोठा घोटाळा उघड : बेकायदेशीर समितीकडून 69 आदिवासींचे वनहक्क डावलले, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान*
*जिल्हाधिकाऱ्यांकडे 11 जणांतर्फे अधिकृत अपीलकर्ते संतोष पारखी कडून अपील दाखल*

AMC24 News 📰 🗞️
चंद्रपूर (दि. 12/10/2026) :* चोरगाव, वरवट, निंबाळा, कोळसा सह 13 गावातील 69 आदिवासी व इतर पारंपारिक वनभूमी धारकांचे वैयक्तिक वनहक्क दावे उपविभागीय वनहक्क समितीने (SDLC) कोणतीही सुनावणी न देता, कोणतीही नोटीस न देता बेकायदेशीरपणे फेटाळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
या विरोधात आज शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख, शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष संतोष लिलाबाई दशरथ पारखी यांनी 11 वनभूमी धारकांचे अपील जिल्हास्तरीय वनहक्क समिती तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे दाखल केले. यावेळी सहाय्यक अधीक्षक (जमीन) यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.

*3 गंभीर बेकायदेशीर बाबी उघड :*
*1) समितीच अस्तित्वात नाही -* महाराष्ट्रात जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणुका जाने. 2020 नंतर झाल्या नाहीत. 21/03/2022 पासून जि.प. बरखास्त असून प्रशासक राजवट आहे. वनहक्क नियम 2008 च्या नियम 5 नुसार जि.प.ने नेमलेले 3 अशासकीय सदस्य (2 ST + 1 महिला) समितीत हवेत. प्रशासकाला सदस्य नेमण्याचा अधिकारच नाही. त्यामुळे दि. 13/08/2026 रोजी झालेली SDLC बैठकच बेकायदेशीर होती.

*2) सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा थेट अवमान -* मा. सर्वोच्च न्यायालयाने WP(C) 109/2008 मध्ये स्पष्ट आदेश दिला आहे की “दावा अंतिम निकाली निघेपर्यंत कोणत्याही वननिवासीला बेदखल करता येणार नाही.” असे असतानाही वनविभागाने दावे प्रलंबित असताना JCB लावून शेतकऱ्यांची पिके नष्ट केली. याबाबत उपविभागीय अधिकारी चंद्रपूर यांनी स्वतः पत्र क्र. 1114/2026 अन्वये वनविभागाला जाब विचारला आहे.

*3) नैसर्गिक न्यायाचा भंग -* एकाही दावेदाराला सुनावणीसाठी बोलावले नाही.
*संतोष पारखी म्हणाले,* _”जिल्हा परिषदच अस्तित्वात नसताना SDLC कशी काय स्थापन झाली? हा 69 गरीब आदिवासी व गैर आदिवासींच्या जमिनी हडपण्याचा कट आहे. आमचे दावे तात्काळ फेरसुनावणीसाठी घ्यावे, नाहीतर आम्ही उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू.”_

यावेळी चंद्रपूर उप-तालुका प्रमुख तथा सोशल मीडिया लोकसभा प्रमुख सुयोग अवथरे हजर होते व 11 अपीलकर्ते – सुरेखा खोब्रागडे, दादाजी खोब्रागडे, ताराबाई खोब्रागडे, सुंदराबाई गोडकर (वारस), नामदेव दुपारे, शामराव कावळे, दिलीप कोकोंडे, सावनाबाई लोनबले, कवडू सिडाम, पुरुषोत्तम लोनबले, विठ्ठल हेडा-येड यांचे संमतीपत्र दाखल करण्यात आले असून उर्वरित 61 जणांचे पुरवणी अर्ज 15/10/2026 पर्यंत दाखल होणार आहेत.
AMC24 News 📰 🗞️
मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुग्घुस 9405714165



