Monday, October 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedविसापूर येथे अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेत 8 हजार उमेदवारांचा सहभाग 17...

विसापूर येथे अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेत 8 हजार उमेदवारांचा सहभाग 17 ऑक्टोबरपर्यंत चालणार भरती प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून निवास, भोजन, आरोग्य व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था

विसापूर येथे अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेत 8 हजार उमेदवारांचा सहभाग

17 ऑक्टोबरपर्यंत चालणार भरती प्रक्रिया

जिल्हा प्रशासनाकडून निवास, भोजन, आरोग्य व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था

 

AMC24 News

चंद्रपूर, दि. 11 : भारतीय सैन्य दलातील अग्निवीर पदांच्या भरतीसाठी विसापूर (ता. बल्लारपूर) येथील क्रीडा संकुलात 2 ऑक्टोबरपासून सैन्य भरती प्रक्रिया उत्साहात सुरू आहे. ही भरती प्रक्रिया 17 ऑक्टोबर पर्यंत चालणार असून, यामध्ये विदर्भासह महाराष्ट्रातील इतर जिल्हे व गुजरात राज्यातील एकूण 8017 उमेदवार सहभागी होत आहेत.

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने भरतीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, भारतीय सैन्याच्या निर्धारित नियम व निकषांनुसार भरती प्रक्रिया शिस्तबद्ध, पारदर्शक व सुरळीतपणे राबविण्यात येत आहे. 

लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची शारीरिक व वैद्यकीय चाचणी : भारतीय सैन्याच्या आर्मी रिक्रूटिंग ऑफिस, नागपूर यांच्या वतीने यापूर्वी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पुढील टप्प्यात शारीरिक क्षमता चाचणी व वैद्यकीय तपासणी घेण्यात येत आहे. यामध्ये अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (दहावी उत्तीर्ण) आणि अग्निवीर ट्रेड्समन (आठवी उत्तीर्ण) या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या भरती प्रक्रियेत विदर्भातील 6556, महाराष्ट्रातील इतर भागांतील 930 आणि गुजरात राज्यातील 531 असे एकूण 8017 उमेदवार सहभागी होत आहेत. भारतीय सैन्य दलात दाखल होऊन देशसेवा करण्याची संधी मिळविण्यासाठी उमेदवारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. 

उमेदवारांच्या भोजनासाठी 12 कंपन्यांचे सहकार्य : भरती प्रक्रियेसाठी विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेषतः उमेदवारांच्या भोजनाची व्यवस्था सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत विविध औद्योगिक कंपन्यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, जीएमआर एनर्जी लिमिटेड, ओमेंट बेस्ट लिमिटेड, अरविंदो रिअॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., केपीसीएल, एसीसी सिमेंट, अंबुजा सिमेंट आणि अल्ट्राटेक सिमेंट या 12 कंपन्यांचा सहभाग आहे. भोजन व्यवस्थेचे नियोजन जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर यांच्या समन्वयाने करण्यात येत आहे.

महिला बचत गटांनाही रोजगाराची संधी :

सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना खाद्यपदार्थ व दैनंदिन गरजेच्या वस्तू सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी माविम तसेच उमेद यांच्या माध्यमातून क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वाराबाहेर महिला बचत गटांचे सशुल्क स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे उमेदवारांची सोय होण्याबरोबरच महिला बचत गटांना व्यवसायाची संधी उपलब्ध झाली आहे.

भरती प्रक्रियेसाठी विविध विभागांचा समन्वय : सैन्य भरती प्रक्रिया सुरक्षित, शिस्तबद्ध व सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी संबंधित विभागांची आढावा बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत. यामध्ये क्रीडा संकुलाची डागडुजी व स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, अखंडित वीजपुरवठा, कायदा व सुव्यवस्था, वैद्यकीय सेवा, अग्निसुरक्षा, वाहतूक व्यवस्था, भोजन सुविधा तसेच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

या व्यवस्थेसाठी पोलीस विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर महानगरपालिका, बल्लारपूर नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, वीज वितरण विभाग, परिवहन विभाग तसेच इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवण्यात आला आहे. भरतीसाठी आलेल्या सैन्य पथकाच्या निवासाची व्यवस्थाही विसापूर येथील तालुका क्रीडा संकुलात करण्यात आली आहे.

कर्नल अंशुल श्रीवास्तव यांच्या अधिपत्याखाली भरती : सदर अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया आर्मी रिक्रूटिंग ऑफिस, नागपूर येथील भरती अधिकारी कर्नल अंशुल श्रीवास्तव यांच्या अधिपत्याखाली भारतीय सैन्याच्या निर्धारित नियम व निकषांनुसार राबविण्यात येत आहे. उमेदवारांची निवड पूर्णतः भारतीय सैन्याच्या नियमानुसार करण्यात येत असून, जिल्हा प्रशासनाकडून सैन्य भरती पथकास आवश्यक प्रशासकीय व पायाभूत सुविधा पुरविण्यात येत आहेत.

भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर यांनी दिली.

AMC24 News 📰 🗞️

मुख्य संपादक

अरविंद चाहादे घुग्घुस 9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular