- एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मानाची नोंद;
चिमुकल्या अधीर जुन्नावारचा माउंट कार्मेल कॉन्व्हेंटमध्ये सत्कार
तिरंगा हातात घेऊन ७ मिनिटांत गांधी चौक ते जटपुरा गेटचा प्रवास;
कठोर परिश्रमाला यशाची झळाळी; राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णासह पदकांचा वर्षाव

AMC24 News 📰 🗞️
चंद्रपूर. अवघ्या ४ वर्षे ७ महिन्यांच्या अधीर अमृता सुबोध जुन्नावार याने इनलाईन स्केटिंग क्षेत्रात आपल्या असामान्य क्रीडा कौशल्याची छाप उमटवत एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मानाची नोंद केली आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीसह राज्य, जिल्हा, राष्ट्रीय व विविध खुल्या स्पर्धांमधील सातत्यपूर्ण यशाची दखल घेत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने माउंट कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलच्या वतीने अधीरचा विशेष सत्कार करण्यात आला.
अधीरच्या क्रीडा प्रवासातील सर्वात उल्लेखनीय कामगिरी म्हणजे २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तिरंगा हातात घेऊन गांधी चौक ते जटपुरा गेट हे अंतर अवघ्या ७ मिनिटांत इनलाईन स्केटिंगद्वारे पूर्ण करण्याचा विक्रम. या ऐतिहासिक कामगिरीची ११ मार्च २०२६ रोजी ‘एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये अधिकृत नोंद झाली. एवढ्या कमी वयात देशाच्या तिरंग्याचा अभिमान जपत केलेली ही कामगिरी अधीरच्या क्रीडा प्रवासातील अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे.

यासोबतच बारामती येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय इनलाईन स्केटिंग मॅरेथॉन स्पर्धेत १ किलोमीटर प्रकारात अधीरने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले. या कामगिरीबद्दल त्याला विशेष कौतुक व गौरवही प्राप्त झाला. याशिवाय जिल्हास्तरीय चॅम्पियनशिपमध्ये विविध प्रकारांत प्रथम क्रमांक, इंडियन स्केटिंग अकॅडमी व एनएमसी स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच Young Achievers Olympiad मध्ये प्रथम क्रमांक मिळवत अधीरने आपल्या यशाची मालिका कायम ठेवली आहे.

अधीरने राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियनशिपमध्येही सहभाग नोंदविला असून, राज्यस्तरीय ओपन स्पर्धा, पुणे येथील स्पर्धांसह विविध प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये त्याने सहभाग घेत पदके मिळविली आहेत. त्याच्या कामगिरीमध्ये सुवर्णपदकांसोबत रौप्य आणि कांस्यपदकांचाही समावेश असून, अत्यंत कमी वयात सातत्याने स्पर्धात्मक क्रीडा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा वाडेकर यांच्या हस्ते अधीरचा सत्कार करण्यात आला. यावेळी माउंट कार्मेल कॉन्व्हेंटच्या सिस्टर कॅथरीन यांची मंचावर उपस्थिती होती. तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक सोनी सर यांचीही उपस्थिती होती. मान्यवरांनी अधीरचे अभिनंदन करून त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अधीरच्या या यशामागे इनलाईन स्केटिंग प्रशिक्षक विनोद निखाडे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले आहे. जून २०२५ पासून इनलाईन स्केटिंगचा सराव सुरू केलेल्या अधीरने अल्पावधीतच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली क्षमता सिद्ध केली आहे.

एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची मानाची नोंद, तिरंगा हातात घेऊन केलेली विक्रमी स्केटिंग कामगिरी, राज्यस्तरीय सुवर्णपदक, जिल्हास्तरीय विजेतेपद, राष्ट्रीय स्तरावरील सहभाग आणि विविध स्पर्धांमधील पदकांची कमाई यामुळे अधीरचा हा सत्कार केवळ एका स्पर्धेतील यशाचा नसून त्याच्या सातत्यपूर्ण क्रीडा प्रवासाचा गौरव ठरला आहे.

चिमुकल्या वयात मोठी कामगिरी!
जिद्द, शिस्त, सातत्य आणि देशप्रेमाची प्रेरणा घेऊन स्केटिंगच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाची नवी ओळख निर्माण करणारा अधीर आज चंद्रपूरच्या क्रीडा क्षेत्रातील एक आश्वासक युवा चेहरा ठरत आहे. त्याच्या या यशामुळे माउंट कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलसह चंद्रपूरच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे.

AMC 24 News 📰 🗞️
मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुग्घुस
9405714165



