राजुरा न्यायालयासमोर भरदिवसा थरारक गोळीबार; युवकाचा मृत्यू
जुन्या वैमनस्यातून हत्येचा संशय; दोन्ही आरोपींचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण
राजुरा (चंद्रपूर) | दि. २४ ऑगस्ट २०२६
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात सोमवारी सायंकाळी घडलेल्या भरदिवसा गोळीबाराच्या थरारक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राजुरा तालुका न्यायालयासमोरील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर दोन हल्लेखोरांनी एका युवकावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतकाचे नाव विनोद उर्फ पापा जाधव (वय ३५), रा. सोमनाथपूर वॉर्ड, राजुरा असे आहे.
न्यायालयासमोरच तीन राऊंड फायरिंग
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. विनोद जाधव हे न्यायालयासमोरील मुख्य रस्त्यावर एका नारळपाणी विक्रीच्या दुकानाजवळ बसले होते. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला.
हल्लेखोरांनी तीन राऊंड फायर केल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील एक गोळी विनोद जाधव यांच्या डोक्याला लागल्याने ते गंभीर जखमी होऊन घटनास्थळी कोसळले. अचानक झालेल्या गोळीबारामुळे न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांची मोठी पळापळ झाली.
चंद्रपूरला हलविले; उपचारादरम्यान मृत्यू
घटनेनंतर नागरिक आणि पोलिसांनी जखमी विनोद जाधव यांना तातडीने राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
जुन्या वैमनस्यातून हत्या?
घटनेची माहिती मिळताच चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. शहरात नाकाबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला.
दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार गोळीबार करणाऱ्या दोन्ही संशयितांनी स्वतःहून राजुरा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे करण बावीस्कर (२१), रा. इंदिरा नगर, चंद्रपूर आणि करण दुर्गाराज मेकलवार (२२), रा. इंदिरा नगर, चंद्रपूर अशी आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक आणि आरोपींमध्ये पूर्वीपासून वाद व वैमनस्य होते. याच जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र हत्येमागील नेमके कारण, गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र आणि घटनेतील इतर बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.
राजुरा शहराच्या मध्यवर्ती भागात,
न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणासमोरच झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
AMC24 News | मुख्य संपादक — अरविंद चाहादे
9405714165



