चंद्रपूर जिल्हा नियोजन समिती तथा जिल्हा खनीज प्रतिष्ठानच्या बैठकीस खासदार डॉ. नामदेव किरसान यांची दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थिती

चंद्रपूर : AMC24 News
चंद्रपूर जिल्हा नियोजन समिती तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या बैठकीस गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव जी किरसान यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून लोकसभा क्षेत्रातील शेतकरी, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रलंबित विकासकामांना गती देण्यासोबतच शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

सावली तालुक्यातील व्याड बुज येथील जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण इमारतीच्या निर्लेखनाचा प्रस्ताव मागील एक ते दीड वर्षांपासून प्रलंबित असल्याचा मुद्दा खासदार किरसान यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक झालेल्या या इमारतीवर तातडीने कार्यवाही करून नवीन शाळा इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील उमा नदी घाट धम्मभूमीला ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ घोषित करण्याचा विषय यापूर्वीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. मात्र, अद्याप कार्यवाही न झाल्याने हा विषय बैठकीच्या इतिवृत्तात घेऊन पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले.

सिंदेवाही तालुक्यात पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांची धानाची रोवणी आणि शेतीची कामे रखडली आहेत. त्यामुळे गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या घोडाझरी उपकालव्यातून शेतीसाठी तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी खासदार डॉ. किरसान यांनी केली. तसेच सावली तुकुम गट क्रमांक १ येथील जीर्ण झालेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
चिमूर–सिंदेवाही–आरमोरी राज्य मार्ग क्रमांक ३२२ ची झालेली दुरवस्था आणि या मार्गावर सुरू असलेली अवजड व ओव्हरलोड वाहनांची वाहतूक याकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्याची प्राधान्याने दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यासोबतच ओव्हरलोड वाहनांवर प्रभावी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

नागभीड महावितरण कार्यालयाकडे मिंथूर, मिंडाळा, कोदेपार व इतर गावांतील १३ शेतकऱ्यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी वीज जोडणीसाठी अर्ज केले आहेत. सिंचनासाठी या शेतकऱ्यांनी स्वतः पाइपलाइनची व्यवस्था केली असतानाही स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरसाठी सुमारे १० ते १२ लाख रुपयांचा खर्च करण्याची अट त्यांच्यासमोर ठेवण्यात आली आहे. हा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून ट्रान्सफॉर्मर बसवावा आणि प्रलंबित वीज जोडण्या तातडीने देण्यात याव्यात, अशी मागणी डॉ. किरसान यांनी केली.

चालू पावसाळ्यात अनेक भागांत अत्यल्प पाऊस झाल्यामुळे धानाची रोवणी करता न आलेल्या शेतकऱ्यांचे कृषी विभागामार्फत गावनिहाय तातडीने सर्वेक्षण करावे, अशीही मागणी त्यांनी केली. अशा शेतकऱ्यांना आगामी रब्बी हंगामासाठी आवश्यक बियाणे मोफत अथवा अनुदानित दरात उपलब्ध करून देण्यासोबतच पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व कृषी सहाय्य योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे सुचना देखील त्यांनी केले.
बैठकीस आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकजी उईके, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजयजी वडेट्टीवार, सुधाकर अडबाले, अभिजीत वंजारी, सुधीरजी मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे यांच्यासह जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुंभरे आदी उपस्थित होते.

लोकसभा क्षेत्रातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन प्रलंबित विकासकामे आणि शेतकरी हिताच्या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी बैठकीत व्यक्त केली.
AMC24 News 📰
मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुग्घूस 9405714165




