Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedबालकांच्या क्षेत्रात काम करताना संवेदनशीलता अत्यंत महत्त्वाची — पोलीस अधीक्षक आयुष नोपानी।...

बालकांच्या क्षेत्रात काम करताना संवेदनशीलता अत्यंत महत्त्वाची — पोलीस अधीक्षक आयुष नोपानी। ।। पोक्सो, बालविवाह व बाल न्याय विषयावर समन्वय बैठक आणि कार्यशाळा

बालकांच्या क्षेत्रात काम करताना संवेदनशीलता अत्यंत महत्त्वाची — पोलीस अधीक्षक आयुष नोपानी

पोक्सो, बालविवाह व बाल न्याय विषयावर समन्वय बैठक आणि कार्यशाळा।  

  • चंद्रपूर, दि. 20 : बालकांशी संबंधित प्रकरणे हाताळताना कोणताही पूर्वग्रह न ठेवता प्रत्येक प्रकरणाकडे संवेदनशीलतेने पाहणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः पोक्सोसारख्या गंभीर प्रकरणांमध्ये पोलीस, आरोग्य, महिला व बालविकास विभाग तसेच बाल संरक्षणाशी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून बालकांना होणारा त्रास कमी करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी केले.
    जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने 19 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात पोलीस विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, बाल कल्याण समिती आणि बाल न्याय मंडळ यांच्या समन्वयाने बैठक व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
  • यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी पोक्सो प्रकरणांमध्ये विविध विभागांमधील योग्य समन्वय हा बालकाला न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले.
    कार्यशाळेचे प्रमुख अतिथी अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना विविध यंत्रणांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत परस्पर समन्वय, संवाद आणि योग्य कायदेविषयक मार्गदर्शनासाठी अशा कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरतात, असे सांगितले.
    यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
    अॅड. अनिरुद्ध पाटील यांनी पोक्सो कायदा, बाल न्याय अधिनियम, बालविवाह प्रतिबंधक कायदा, विविध प्रकरणांतील अनुभव तसेच संबंधित यंत्रणांमधील समन्वय या विषयांवर प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. बालकांच्या क्षेत्रात काम करताना संवेदनशीलता आणि ‘बालस्नेही दृष्टिकोन’ किती महत्त्वाचा आहे, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
    बालकांशी संबंधित प्रकरणांमध्ये सर्व विभागांनी एकत्रितपणे काम केल्यास त्याचा बालकांच्या हितावर तसेच न्यायप्रक्रियेवर सकारात्मक परिणाम होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
  • कार्यशाळेच्या शेवटी विविध यंत्रणांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे विषयतज्ज्ञ व मान्यवरांनी निरसन केले.
    जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांनी प्रास्ताविकातून पोक्सो कायदा, बाल न्याय अधिनियम, बालविवाह तसेच बालकांसोबत काम करताना येणाऱ्या अडचणी आणि कायदेविषयक बाबींचे पुनरावलोकन व्हावे, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
    कार्यक्रमाचे संचालन कल्पना राजुरकर यांनी केले, तर अभिषेक मोहुर्ले यांनी आभार मानले.
  • कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील दोषसिद्धी कक्षाचे एपीआय विनोद रहांगडाले, महिला व बालविकास विभागाचे अतिश चव्हाण, अजय साखरकर यांच्यासह पोलीस विभाग, आरोग्य विभाग, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने सहकार्य केले.
    बालकांचे संरक्षण, त्यांचा सन्मान आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय आणि संवेदनशीलता हीच प्रभावी कार्यपद्धती ठरते.

AMC24 News 📰 🗞️

मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घूस

9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular